सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन
शैक्षणिक उपक्रम
शिक्षणाला आधार, गुणवत्तेला प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी साथ.
शिष्यवृत्ती व शैक्षणिक मदत
शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यात २२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील मॉडर्न शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे यांचा सातवा शिष्यवृत्ती वितरण सोहळा झाला. या सोहळ्यात २२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनचे संचालक योगेश आंबादास देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशपांडे यांनी याच शाळेत पहिली ते दहावी शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्यांच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण ठरला.
कार्यक्रमात मा. श्री. सुभाष कदम, विद्यापीठ भाग संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षण हे विद्यार्थ्यांची वैचारिक क्षमता वाढवण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे सांगितले. सामाजिक एकता, अनुशासन आणि सेवाभावाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. प्रा. डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांनी आपल्या भाषणात बालपणीची आठवण सांगितली. त्या लहान असताना पतसंस्थेची सुरुवात झाली होती; आज या संस्थेचा मोठा वृक्ष झाला असून त्याचा अनेकांना लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी एकबोटे यांचीही उपस्थिती होती.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने सुरू झालेली ही पतसंस्था गेली सात वर्षे आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे. या उपक्रमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या चालू वर्षाच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली जाते. २५ कोटी रुपयांचे भागभांडवल असलेली पतसंस्था गरजू समाजघटकांनाही आर्थिक आधार देते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशपांडे यांनी, “आज मदत घेणारे आपण उद्या मदत देणारे व्हायला हवे,” असा विचार मांडला. सुभाष कदम यांनी दोन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली, तर सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनतर्फेही दोन विद्यार्थ्यांचा या वर्षाचा शैक्षणिक खर्च उचलण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देणाऱ्या पतसंस्थेचे आणि कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
सुदर्शन विद्यार्थी प्रेरणा पुरस्कार–२०२६
शिक्षणाला प्रोत्साहन • विद्यार्थ्यांना प्रेरणा
कृष्णकुमार गोयल आणि योगेश देशपांडे यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

“गुणांपेक्षा विद्यार्थ्यांची जिद्द आणि ध्येय अधिक महत्त्वाचे.”
कार्यक्रम वृत्तांत
पुणे : दहावीचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील शेवट नसून पुढील प्रवासाची सुरुवात आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या प्रगतीबरोबर समाजाच्या कल्याणासाठी करावा, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थी गुणगौरव समारंभात देण्यात आला.
क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ३६ वा “हिंदू मागासवर्गीय विद्यार्थी गुणगौरव समारंभ” रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला.
कार्यक्रमाला कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल आणि देशपांडे लँडमार्कचे व्यवस्थापकीय संचालक तथा सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनचे संस्थापक-संचालक योगेश देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात इयत्ता दहावीमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना “क्रांतिवीर लहुजी वस्ताद पुरस्कार” आणि “पूजनीय श्रीगोलवलकर गुरुजी पुरस्कार” प्रदान करण्यात आले. सुदर्शन भारत सेवा फाउंडेशनतर्फे श्री. अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ५५ विद्यार्थ्यांना “सुदर्शन विद्यार्थी प्रेरणा पुरस्कार–२०२६” देऊन गौरविण्यात आले.
स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी सुरू केलेले सुदर्शन भारत सेवा फाउंडेशन आरोग्य, कर्करोगविषयक जनजागृती, शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रांत कार्यरत आहे. “स्वतःसाठी थोडे आणि समाजासाठी सर्वस्व” या भावनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गुण कमी अथवा जास्त असले तरी एका परीक्षेचा निकाल विद्यार्थ्याचे संपूर्ण आयुष्य ठरवत नाही. भविष्यात प्रत्येक विद्यार्थ्याला अनेक संधी उपलब्ध होणार असून सातत्य, जिद्द आणि प्रामाणिक परिश्रमांच्या बळावर मोठे यश मिळवता येते, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद रामाकांत एकबोटे यांच्या समाजाभिमुख कार्याचे आणि विद्यार्थी प्रोत्साहन उपक्रमातील सातत्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
सोहळ्यातील क्षण
कार्यक्रमाचा व्हिडिओ
पुरस्कार सोहळ्याची झलक पाहा. व्हिडिओ सुरू करण्यासाठी प्ले बटण दाबा.
कालावधी : सुमारे ३६ सेकंद
व्हिडिओ डाउनलोड करावृत्तपत्रांतील नोंद
वृत्तपत्र प्रसिद्धी
२ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेली वृत्ते. पूर्ण आकारात वाचण्यासाठी कात्रणावर स्पर्श करा.


